Saturday, August 7, 2010

ती दोघं - २

अनिल आणि आदिती बराच वेळ तसेच समुद्राच्या अविरतपणे किनार्‍याकडे उसळणार्‍या लाटांकडे पाहत उभे राहिले. किती वेळ यामधे निघून गेला याचं त्या दोघांनाही भानच नव्हतं. जसं तिला निसर्ग आणि आपण याशिवाय येथे कोणी आहे याचा फारसा विचारही नव्हता, तसं त्याला ती, तो आणि निसर्ग याखेरीज कोणी नसतं तर किती बरं झालं असतं हे राहून राहून वाटत होतं.


"ओ संयोजक चला राव, भुका लागल्यात." असं म्हणून शेखर उगीच ख्यॅख्यॅख्यॅख्यॅ करून हसत राहिला. विश्वामित्रांचा तपस्याभंग मेनकेऐवजी कोण्या रूप बदललेल्या मारीचाने जर केला असता, तर त्यांनी ज्या संतापमिश्रीत तुच्छ नजरेने त्याच्याकडे पाहिले असते अगदी तीच नजर अनिलने शेखरवर टाकली. मात्र, त्याच्या नकळत आदितीच्या लक्षात ती आली होती.
"चला. मला ही बरीच भूक लागलीये." उसनं हसू तोंडावर आणून अनिल शेखरबरोबर चालू लागला आणि त्यांच्यामागून आदिती.


संध्याकाळी मुंबईत परतताना अनिल अगदी अबोल होऊन निश्चलपणे गाडीत बसून होता. सकाळच्या आदितीच्या त्या रूपाचा अगदी ’फ्लॅशबॅक’च त्याच्या डोळ्यासमोरून हलेना. तिच्याबरोबरच्या त्या आठवणीतून काही केल्या त्याला बाहेर निघवेचना. जो पाऊस माटुंग्याच्या चाळीतल्या खोलीच्या पत्र्यावर ताशा वाजवायचा, लहानपणी मित्रांबरोबर धुडगूस घालायला प्रोत्साहन द्यायचा, ज्या पावसाने डिप्लोमाच्या प्रवेशावेळी कोसळून कोसळून वात आणला होता, पुढे कॉलेज सुरू झाल्यावर मात्र अगणित आऊटिंग्स आणि ट्रेकिंग्समधे साथ दिली होती. त्याच पावसाचे एक निराळेच रूप आदितीच्या गालावरून ओघळणार्‍या थेंबांमधे त्याला पहायला मिळालं होतं. तिच्या त्या सकाळचे भिजलेल्या रूपड्याला आठवणीतही धक्का लागू नये म्हणून ती उतरून जाईपर्यंत त्याने तिच्याकडेही पाहिलं नव्हतं.


मुंबईत आल्यावर दुसर्‍या दिवसापासून तेच ते रहाटगाडं चालू झालं. काही महिने लोटले मधे आणि त्यानंतर अनिल, आदिती क्वचितच एकमेकांना भेटत होते. तो सर्व्हिस आणि सेल्स अशा दोन्ही आघाड्या संभाळायचा त्यामुळे तो ऑफिसपेक्षा साइट्सवरच जास्त. तर तिचा एरिया वेगळा होता म्हणून त्या कामानिमीत्तही एकत्र येण्याचा योग कमीच. अशावेळी त्याला आधार फक्त फोनचाच. पण तिला काय वाटेल आणि काय नाही या विचारापायी तसे फोनही पसाभर होत नव्हते. अनिलचा एकमेव आधार म्हणजे मंथली सेल्स मिटींग. आधी बोअरिंग वाटणारी आणि बॉसला आपलं फ्रस्टेशन काढण्यासाठी केलेली सोय, अशी ती मिटींग त्याला हवीहवीशी वाटू लागली. एव्हाना अनिलच्या या फिलींग्स आदितीच्याही लक्षात यायला लागल्या होत्याच. पण तिच्यातला स्त्रीसुलभपणा तिला भावना आवरायला सांगत होता तर तिचा करारी बाणा ’असल्या गोष्टींसाठी बराच वेळ पडलाय आदिती’ असं सुनावत होता.


’त्या’ दिवशी मात्र असं काही झालं की या दोघांतलं भावनिक अंतर पार विरून गेलं. एरवी, अनिलला समोरून फोन न करणार्‍या आदितीचा त्याला फोन आला आणि त्याने तो अगदी खुशीत उचलला. त्याच्या नेहमीच्या ’हॅलो’मधे आज उगीचच आनंद ओसंडून चालला होता. पण पुढून आदितीचा ’हॅलो’ आलाच नाही.
"उद्या तुला माझ्याबरोबर यायला जमेल का?" आदितीचा आवाज भलताच धीरगंभीर होता. तिच्या नेहमीच्या करारी बेफिकीरीची झलकही नव्हती.
"काय झालंय आदिती? आणि कुठे जायचय?" अनिलच्या आवाजाचाही नूर क्षणार्धात पालटला.
"नागपूरला जायचय. बाबा..."
"बाबा? काय झालं त्यांना? सर्व काही ठीक तर...." अनिलला वाक्य पूर्ण न करू देता ती बोलू लागली.
"ते मी सगळं उद्या जाता जाताच सांगेन. उद्या सकाळी सातची फ्लाईट आहे. माझी आई आणि मावशी असेल सोबत. काका कामानिमीत्त दिल्लीमधे आहेत, आणि माझा मामा न्यूझिलॅंडमधे. ते दोघेही पोहोचतीलच उद्यापर्यंत. तसं कोणी पुरूष माणूस बरोबर नाहीये म्हणून तुला विचारते. जमेल का तुला यायला?"
"हो. येईन मी तुझ्यासोबत. तिकीटं बुक केलीयेत का करायची आहेत?"
"मी करतेच आहे आत्ता. एनीवेज, तुला त्रास देतेय त्याबद्दल सॉरी आणि तु येतो आहेस म्हणून थॅंक्स."
"हम्म्म्म्म्म..."
ही वेळ खरं तर आभारप्रदर्शनाची नव्हतीच मूळी। अनिलला वाटलं की तिला हे बोलून दाखवावं. पण आदिती अशीच होती. ज्या त्या गोष्टी तिथल्या तिथे मिटवणारी. प्रत्येक बाब योग्य वेळी एकनॉलेज करायला हवी, वेळ निघून गेल्यावर होणारी हळहळ त्यामूळे टळते. उगाच भूतकाळाचं ओझं वर्तमानात वाहून आणण्यात काही मजा नाही असल्या विचारांची ती.


आदितीचे वडील ज्या सामाजिक संस्थेसाठी काम करत होते, त्या संस्थेच्या कामानिमीत्त ते नागपूरला गेले होते. तिकडे त्यांच्या गाडीला अपघात होऊन त्यांच्यासह त्याच संस्थेची अजून काही माणसेही मृत्युमूखी पडली होती. आदितीचे काका पोहोचेपर्यंत आणि नंतरही तिला अनिलचा खरंच फार आधार वाटायला लागला होता.


त्या घटनेनंतर काही आठवड्यांनी आदिती पुन्हा कामाला यायला लागली होती. आताशा अनिल आणि ती एकमेकांच्या जवळ यायला लागले होते. अशाच एका संध्याकाळी दोघे मरिन ड्राईव्हला भेटले.
"इकडे आलं की फार छान वाटतं नाही अनिल?"
"हो गं"
"मला त्या अलिबागच्या ट्रिपची आठवण होते. त्यादिवशी काय छान पाऊस पडत होता. बराच वेळ उभे होतो ना आपण..."
"त्या दिवशी पावसात भिजल्यावर फार छान दिसत होतीस तु"
"आणि तु हे आज मला सांगतोयस होय?"
"अरे तेव्हा तुला मी जेमतेमच ओळखत होतो ना, एकदम अशी तुझी तारीफ केल्यावर कशी रिएक्ट होशील याचा अंदाज नव्हता ना त्यावेळी."
"हम्म्म्म, जरा फणकार्‍यानेच वागते मी, तुझाही तसा समज होणं स्वाभाविकच होतं म्हणा. पण खरं सांगू का, सेल्सचा जॉब करताना एक एक असे लोक भेटले ना, की थोडं टफ व्हावच लागत. पण त्यादिवसानंतर का माहित नाही पण तुझ्याबरोबर बोललं की, भेटलं की फार बरं वाटतं. एक मित्र म्हणून तुझा फार आधार वाटायला लागला." आदिती मग तिच्या बालपणाविषयी, कॉलेजबद्दल सर्व काही अनिलला न विचारताच सांगू लागली. जणू काही फार दिवसांपासून जे तिच्या मनात साचून राहिलं होतं त्या सर्वच गोष्टी ऐकायला एक हक्काचा श्रोताच मिळाला होता तिला. बोलता बोलता ती तिच्या बाबांविषयी बोलायला लागली आणि एकदम भावनाविवश होऊन अनिलच्या खांद्यावर डोकं ठेवून तिने आपल्या अश्रूंना वाट करून दिली.


दोघांच्या मैत्रीचे बंध आणखीच घट्ट होत गेले.

(क्रमश:)

No comments:

Post a Comment