Sunday, August 8, 2010

ती दोघं - ३

अनिल आणि आदितीच्या या फुललेल्या नात्यामधे प्रपोज वगैरे करायची गरजच नव्हती. आदितीने स्पष्टपणे तसं त्याला सांगूनच टाकलं होतं.
"अनिल, मला वाटतय तु मला आवडायला लागलायस"
"अजून वाटतच आहे की बर्‍यापैकी खात्री ही वाटातीये?"
"हा हा हा, हो बर्‍यापैकी खात्री आहे."
"चला बरं झालं तुच विचारलस."
"मी विचारलं नाहीये तुला, सांगतेय." स्मितहास्याने आदितीने आपला मुद्दा स्पष्ट केला.
"ओह! मग मी ही तुला सांगतो, तुही मला आवडतेस म्हणून. पण तुला विचारायचं कसं ते नक्की कळतच नव्हतं. सरळ विचारलं तर फस्सकन अंगावर यायचीस, फिरवून फिरवून विचारलं असतं तर ’काय ते स्पष्ट बोल’ म्हणून वचकली असतीस."
"एवढी काही दुष्ट नाहीये रे मी."
"म्हणूनच आवडलीस गं तु, एक बरं झालं की बरीच नसलीस तरी थोडी फार तरी दुष्ट आहेस हे मान्य केलंस. ही प्रांजळ कबुली समजू की प्रेमळ धमकी?" असेच मग काही निरर्थक गप्पा मारून दोघे घरी जायला निघाले.


दोघे एकमेकांना आवडत होते पण हेच ते प्रेम का, याची खातरजमा करून घेण्यासाठी आदिती काही फारसा विचार करणार्‍यांपैकी नव्हती. एका माणसाबरोबर रहायचं म्हटल्यावर काही तडजोडी कराव्या लागतात, आणि त्या अनिलबरोबर करायला तिची ’बर्‍यापैकी" तयारी होती. अनिलला मात्र प्रेम म्हणजे काय ते नक्की हे का ते हे माहित नसल्यामूळे तो इतक्या खोल विचारात पडला ही नव्हता.


आदितीने अनिलबद्दल आपल्या आईला कल्पना देऊन ठेवली होतीच. तिला भावंडं नव्हती. शाळा, कॉलेजपासून फारसे मित्र-मैत्रीणी वगैरे देखील नव्हते. आधीपासूनच घरातल्या निकोप स्वातंत्र्यामूळे आणि आई-वडीलांच्या मनमोकळ्या स्वभावामूळे तिला मन मोकळं करायचं झालं तर ती आईपाशी करे. पण त्यालाही एक मर्यादा होती कारण शेवटी ’जनरेशन गॅप’ होतीच. याउलट अनिलची आणि त्याच्या बहिणीची जवळीक लहानपणापासूनच. त्याने घरी खाल्लेल्या माराएवढाच मार सवितामूळेच वाचला होता. त्याची बाहेर कोणाबरोबर भाडणं झाली तर तावातावाने त्याचीच बाजू घेणारी पहिली व्यक्ती म्हणजे सविता. चूक अनिलची असली तर घरी आल्यावर ती त्याला जाम सुनावे, पण बाहेर मात्र त्याचीच बाजू. यामूळे अगदी कमावता झाल्यावरही सविता हीच अनिलचा आधार होती. तिला फोनवरून आदितीबद्दल त्याने सगळं सांगून टाकलं शिवाय घरी सांगायची जबाबदारीही तिच्यावरच सोपवून तो निश्चिंत झाला.


कबूल केल्याप्रमाणे, सविताने आई-बाबांची समजूत घालून अनिलचा मार्ग मोकळा करून दिला. जेमतेम सात-आठ महिन्यांचं त्यांचं नातं. अनिलच्या बाबांच्या इच्छेप्रमाणे, तीन महिन्यांनी, मार्चमधे लग्न उरकायचं ठरलं. आदिती आणि तिच्या आईचीही तयारी होतीच. नाईक मॅडम कितीही पुढारलेल्या विचारांच्या असल्या तरी ’या वर्षी नाही उरकलं तर, तीन वर्ष थांबावं लागेल’ या नातेवाईकांच्या दबावाला बळी पडल्याच. या सर्वात सविता मात्र एकटीच अशी होती, जिला वाटत होतं की फारच घाई होतेय म्हणून. तिने अनिलला, आई-बाबांना, एवढंच नाही तर आदितीलाही परोपरीने सांगायचा प्रयत्न केला, पण सारे व्यर्थ. शेवटी पंचविसाव्या वर्षीच दोघे बोहल्यावर चढले.


लग्न अगदी थाटामाटात नसले तरी बर्‍यापैकी चांगल्या रितीने पार पडले. नव्या नवलाईचे दिवसही निघून गेले. दोघांनीही आपले मोर्चे परत कामाकडे वळवले. आणि इकडेच पुढच्या संघर्षाची नांदी सुरू झाली. संघर्ष यासाठी कारण आदिती ही नेहमी मीच कशी बरोबर ते सांगणारी, आणि तिच्या या आडमुठेपणला अनिलही नंतर नंतर ’तु बरोबर असलीस तरी तुझ्यापेक्षा मीच जास्त बरोबर आहे’ हे तत्व उराशी बाळगू लागला.


अनिलची आई ’हाऊस मेकरच’ होती. घरी असल्यामूळे तिने कधीही कामासाठी बाई लावली नव्हती. पण आताशा वय होत चालल्यामूळे जेवण सोडून बाकी कामाला बाई घरात आली. जेवण सध्या त्याच बनवत होत्या. पण आता सून घरात असताना किमान एक वेळचं तरी तिने करावं अशी त्यांची माफक अपेक्षा. तशी ती त्यांनी अनिलकडे आणि त्याच्या बाबाकंडे बोलूनही दाखवली. पण दोघांनीही त्यात फारसं लक्ष नाही घातलं. अनिलच्या बाबांनी तर "तुमची घरची आघाडी तुम्हीच लढा, आम्ही या वादात न्युट्रल!" असा अनाहूत सल्ला देऊन टाकला.


"अगं आदिती" रात्री जेवता जेवता आईने विषय काढलाच.
"भाजी छान झालीये आई"
"हं, मी काय म्हणत होते, इतके वर्ष मी घरातली कामं करते आहे. पण बाहेरच्या बाईने माझ्या घरात काही काम केलं की मला कसंकसंच वाटायचं. म्हणून इतके दिवस बाई ठेवली नव्हती. तु आलीस घरात, पण जॉब करत असल्याने सगळच करण तुला शक्य नाही हेही मला कळत. फार नाही पण एक वेळच्या जेवणात तरी मदत करत जा."
"वेळ मिळत जाईल तसं नक्की करेन." आदितीने तो विषय तिथेच तोडत चर्चेला मतभेदाचं स्वरूप येऊ नाहे दिलं.
पण रात्री अनिलच्या कानात तिने गुणगुण सुरू केलीच.
"आता जॉब करतेय म्हटल्यावर एवढं सगळं कशी करणार मी, तुच सांग. त्यातूनही ऑफिस वर्क असतं तर एक वेळच काय तर, दोन्ही वेळचं केलं असतं. पण तुलाही माहितीये की, सेल्समधे ऑफिसचं दर्शन हे फक्त रिपोर्टिंग पुरतंच होतं म्हणून."
"हम्म्म्म्म्म"
"मग अशावेळी जर त्यांना जमत नसेल तर, जेवणालाही एखादी बाई ठेवली तर बिघडलं कुठे त्यात. पण नाही. कितीवेळा समजावून सांगितलं तरी का ऐकत नाहीत त्या?"
"बाकी काही असू दे पण घरचं किचन घरच्याच बाईनेच चालवावं अशी माझीही ठाम अपेक्षा आहेच. रोज नाही पण कधीतरी....शेवटी एका घराची खाद्य संस्कृती त्या घरची आयडेंटिटी असते. आणि त्यात घरच्या बाईचाच जर हातभार नसेल तर मग त्या इतिहासात नाव कोणाचं लावायचं" अनिलने जरा विनोदनिर्मिती करून ताण सैल करायचा प्रयत्न करत आपला मुद्दा मांडला. "नाहीतर, अकाऊंट्स मधे ट्रान्स्फर करून घेऊया का आपण तुझी?"
"काही गरज नाहीये. ज्या फिल्डमधे पाच वर्ष काढली, त्यातून निघून जाऊ का? मागचं सगळं ब्लॅंक की मग...."
"डेफिनिटीव्ह स्टेटमेंट नव्हतं गं ते, सहज म्हणून एक मधला मार्ग सुचवला." अनिलने पडतं घेऊन विषय तिथेच संपवला.


त्यादिवसानंतर आदिती काही बदलली नाही, मात्र तिच्या सासूबाईंची तिच्याबद्दलची मतं मात्र अधिकच तीव्र होत गेली. तिच्या बर्‍याचवेळा उशीरा येण्याबद्दल, कपड्यांबद्दल, थोडक्यात जिथे जिथे म्हणून शक्य होईल, तिथे तिथे सगळीकडेच तिच्यावर बोलायला सुरूवात केली. अनिलच्या बाबांनी त्यांना भरपूर समजावण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ! ज्या ज्या वेळी त्या तिला बोलत, त्या त्या रात्री अनिलच्या खोलीतला दिवा फार उशीरापर्यंत जळायला लागला. आताशा तिने आपण वेगळं राहू असं त्याच्यामागे टुमणं सुरू केलं. घाटकोपर, कांजूरला वगैरे रहायला गेलो तर प्रवासाचा वेळही वाचेल, आणि इकडची रोजची पारायणंही. अनिलचं मन मात्र काही मानत नव्हतं. एकीकडे कामाचं प्रेशर, आणि दुसरीकडे घरच्या कुरबुरी. त्यालाही समजत होतं की आईने असं नको करायला, पण आदितीनेही कुठेतरी थोडी तडजोड करावी हे त्याने सांगितल्यावर, ती जे करते ते कसे लॉजिकली बरोबर आहे हे तिच्याकडून ऐकून त्याल गप्प बसावे लागे. एक मात्र होतं, एवढं सगळं चालू असताना आदितीने आईला इतक्या दिवसांत एकदाही उलटून उत्तर दिलं नव्हतं की भांडण केलं नव्हत. तिच्यासारख्या विचारसरणीच्या मुलीने असं करावं याचं त्याला कौतुक तर होतंच पण त्याहून जास्त आश्चर्य वाटत होतं. तिचा हा शांतपणा त्याला मात्र फारच त्रासदायक ठरू लागला होता.


बर्‍याच दिवसांपासून आदिती दर रविवारी या घरातला वैताग चुकवण्यासाठी तिच्या माहेरी रहायला लागली. यावर अनिलची आई जामच वैतागायला लागल्या होत्या. होता होता एका रविवारी त्यांनी अनिललाच फार बोलून घेतलं. वैतागलेला अनिल मग उठला आणि आदितीला आणायला जायच्या आधी तो सविताकडे गेला. त्याचा कोंडमारा त्याने सवितासमोर अगदी सविस्तरपणे मांडला.
"यावर मी काय सांगू तुला?"
"तु काही सांगावस म्हणून सांगतच नाहीये. पण कोणी ऐकणारंच नाहीये म्हणून तुला सांगतोय. ऑफिसमधे गेलं की तिकडचं टेन्शन्स आणि घरी आलं की इकडचं. सेल्स पिच सोडलं तर जास्त बोलतच नाही मी कुठेही."
"सगळ्यांना मी त्यावेळी सांगत होते की एवढ्या लवकर नका करू काही. पण जाऊ दे."


तिथून तो निघून आदितीला आणायला गेला. परत येताना आणि नंतरही बरेच दिवस ती वेगळं रहाण्याबद्दल त्याला सतत सांगत राहिली. हा रोजचाच त्रास कमी व्हावा म्हणून मग त्यानेही अगदी निरेच्छेनेच भांडूप मधे एक भाड्याचा फ्लॅट बघितला आणि जायचा दिवस नक्की केला. घरातून जाण्याची सर्व लॉजिकल कारणं दिल्यावर बाबांचा चेहरा फारच उतरला होता. आई मात्र अगदीच तटस्थ होती. काहीतरी सुटून चाललय हे अनिललाही जाणवत होतं आणि बाबांनाही. पण परिस्थितीसमोर जे समोर आलं होतं ते स्विकारण्याचा दोघांनीही निश्चय केला.


नविन घरामधे आल्यावर सगळंच आदितीच्या मनाप्रमाणे बर्‍याच गोष्टी व्हायला लागल्या होत्या. त्या तशा झाल्या कारण आदिती फार हट्टी होती असं नाही, पण अनिलची फारशी मतंच नव्हती. भांडूपमधे येऊन त्यांना पाच-सहा महिने लोटले. दोघांची कामं फार वाढली होती. कामाचे तासही वाढले. कधी बाई यायची, कधी नाही, तर कधी त्यांच्या वेळा मागे-पुढे. अनिलपेक्षा आदितीच घरी जास्त वेळ असायची. बाहेरच्या कामानंतर बर्‍याचदा घरचं सगळंच बघणं यायचं. सासूसमोर काही न बोलणारी आदिती, अनिलशी घरच्या कामात मदत करण्यासाठी आग्रहीपणाने भांडणं करायला लागली. तिचं काही चुकत होतं असं नाही, पण अनिलने कधी घरी ग्लासही विसळला नव्हता आणि आता नविन काही शिकायची त्याची ना तयारी होती ना इच्छा. वाढता वाढता भांडणं विकोपायला जायला लागली. आताशा दोघांचा वेळ भांडूपपेक्षा आपापल्या घरीच जायला लागला होता.


एके दिवशी संध्याकाळी आईकडून आल्यावर आदिती बोलायला लागली, तिचा सूर अगदीच निर्वाणीचा होता असं अनिलला जाणवलं.
"जसं चाललय, ते व्यवस्थित आहे असं वाटतं का तुला?"
"नक्कीच नाही. पण तु कुठेच नमतं घ्यायला तयार नसतेस."
"म्हणजे माझंच चुकतं का नेहमी?"
"मी असं म्हटलं नाहीये."
"मग? कामावर तर मीपण जातेच आहे की, तुही घरामधे थोडाफार मदत केलीस तर..."
"नाही जमत नाही मला ते. आणि जमेल असंही वाटत नाही. तुला काही प्रॉब्लेम आहे का?"
"आपण जरा घाईच केली असं वाटतय."
"म्हणजे?"
"दीड वर्ष झालेय पण सलग एक आठवडाभर तरी आपण शांतपणे झोपलोय का रात्री? आणि ही घरची टेन्शन्स कामही अफेक्ट करतात."
"अं...मलाही असंच वाटतय."
"तुला सांगितलं नाहीये, म्हणजे तशी सांगावसच नाही वाटलं. मी डेल्टा इन्फ्रा मधे जॉइन करतेय एक तारखेपासून आणि दोन महिन्यांच्या ट्रेनिंगनंतर बॅंगलोरला पोस्टिंग बहुधा. मला मागे काहीच लोंबकळत ठेवायचं नाहीये, आपण वेगळं होऊया."
"हम्म्म्म्म...आईशी बोललीस तुझ्या?" अनिलच्या आवाजात किंचीतही आश्चर्य नव्हतं, जणू काही त्याला जे सांगायचं होतं ते तिच बोलत होती.
"हो"


डोंबिवलीला सविता घरी आली होती. अनिलनेच बोलावून घेतलं होतं. जे त्याने ठरवलं होतं, ते तोच सांगणार होता.
"मी आणि आदितीने वेगळं व्हायचा निर्णय घेतलाय." कोणालाच आश्चर्यही झालं नाही अथवा धक्काही. हे कधी ना कधी होणारच असं जणू गृहीतच धरलं होतं त्यांनी.
"पंचविसाव्या वर्षी लग्न आणि सत्ताविसाव्या वर्षी घटस्फोट! फार उथळ झालायस तु अनिल." बाबा एवढं बोलले आणि विषय तिथेच संपला.

(समाप्त)

Saturday, August 7, 2010

ती दोघं - २

अनिल आणि आदिती बराच वेळ तसेच समुद्राच्या अविरतपणे किनार्‍याकडे उसळणार्‍या लाटांकडे पाहत उभे राहिले. किती वेळ यामधे निघून गेला याचं त्या दोघांनाही भानच नव्हतं. जसं तिला निसर्ग आणि आपण याशिवाय येथे कोणी आहे याचा फारसा विचारही नव्हता, तसं त्याला ती, तो आणि निसर्ग याखेरीज कोणी नसतं तर किती बरं झालं असतं हे राहून राहून वाटत होतं.


"ओ संयोजक चला राव, भुका लागल्यात." असं म्हणून शेखर उगीच ख्यॅख्यॅख्यॅख्यॅ करून हसत राहिला. विश्वामित्रांचा तपस्याभंग मेनकेऐवजी कोण्या रूप बदललेल्या मारीचाने जर केला असता, तर त्यांनी ज्या संतापमिश्रीत तुच्छ नजरेने त्याच्याकडे पाहिले असते अगदी तीच नजर अनिलने शेखरवर टाकली. मात्र, त्याच्या नकळत आदितीच्या लक्षात ती आली होती.
"चला. मला ही बरीच भूक लागलीये." उसनं हसू तोंडावर आणून अनिल शेखरबरोबर चालू लागला आणि त्यांच्यामागून आदिती.


संध्याकाळी मुंबईत परतताना अनिल अगदी अबोल होऊन निश्चलपणे गाडीत बसून होता. सकाळच्या आदितीच्या त्या रूपाचा अगदी ’फ्लॅशबॅक’च त्याच्या डोळ्यासमोरून हलेना. तिच्याबरोबरच्या त्या आठवणीतून काही केल्या त्याला बाहेर निघवेचना. जो पाऊस माटुंग्याच्या चाळीतल्या खोलीच्या पत्र्यावर ताशा वाजवायचा, लहानपणी मित्रांबरोबर धुडगूस घालायला प्रोत्साहन द्यायचा, ज्या पावसाने डिप्लोमाच्या प्रवेशावेळी कोसळून कोसळून वात आणला होता, पुढे कॉलेज सुरू झाल्यावर मात्र अगणित आऊटिंग्स आणि ट्रेकिंग्समधे साथ दिली होती. त्याच पावसाचे एक निराळेच रूप आदितीच्या गालावरून ओघळणार्‍या थेंबांमधे त्याला पहायला मिळालं होतं. तिच्या त्या सकाळचे भिजलेल्या रूपड्याला आठवणीतही धक्का लागू नये म्हणून ती उतरून जाईपर्यंत त्याने तिच्याकडेही पाहिलं नव्हतं.


मुंबईत आल्यावर दुसर्‍या दिवसापासून तेच ते रहाटगाडं चालू झालं. काही महिने लोटले मधे आणि त्यानंतर अनिल, आदिती क्वचितच एकमेकांना भेटत होते. तो सर्व्हिस आणि सेल्स अशा दोन्ही आघाड्या संभाळायचा त्यामुळे तो ऑफिसपेक्षा साइट्सवरच जास्त. तर तिचा एरिया वेगळा होता म्हणून त्या कामानिमीत्तही एकत्र येण्याचा योग कमीच. अशावेळी त्याला आधार फक्त फोनचाच. पण तिला काय वाटेल आणि काय नाही या विचारापायी तसे फोनही पसाभर होत नव्हते. अनिलचा एकमेव आधार म्हणजे मंथली सेल्स मिटींग. आधी बोअरिंग वाटणारी आणि बॉसला आपलं फ्रस्टेशन काढण्यासाठी केलेली सोय, अशी ती मिटींग त्याला हवीहवीशी वाटू लागली. एव्हाना अनिलच्या या फिलींग्स आदितीच्याही लक्षात यायला लागल्या होत्याच. पण तिच्यातला स्त्रीसुलभपणा तिला भावना आवरायला सांगत होता तर तिचा करारी बाणा ’असल्या गोष्टींसाठी बराच वेळ पडलाय आदिती’ असं सुनावत होता.


’त्या’ दिवशी मात्र असं काही झालं की या दोघांतलं भावनिक अंतर पार विरून गेलं. एरवी, अनिलला समोरून फोन न करणार्‍या आदितीचा त्याला फोन आला आणि त्याने तो अगदी खुशीत उचलला. त्याच्या नेहमीच्या ’हॅलो’मधे आज उगीचच आनंद ओसंडून चालला होता. पण पुढून आदितीचा ’हॅलो’ आलाच नाही.
"उद्या तुला माझ्याबरोबर यायला जमेल का?" आदितीचा आवाज भलताच धीरगंभीर होता. तिच्या नेहमीच्या करारी बेफिकीरीची झलकही नव्हती.
"काय झालंय आदिती? आणि कुठे जायचय?" अनिलच्या आवाजाचाही नूर क्षणार्धात पालटला.
"नागपूरला जायचय. बाबा..."
"बाबा? काय झालं त्यांना? सर्व काही ठीक तर...." अनिलला वाक्य पूर्ण न करू देता ती बोलू लागली.
"ते मी सगळं उद्या जाता जाताच सांगेन. उद्या सकाळी सातची फ्लाईट आहे. माझी आई आणि मावशी असेल सोबत. काका कामानिमीत्त दिल्लीमधे आहेत, आणि माझा मामा न्यूझिलॅंडमधे. ते दोघेही पोहोचतीलच उद्यापर्यंत. तसं कोणी पुरूष माणूस बरोबर नाहीये म्हणून तुला विचारते. जमेल का तुला यायला?"
"हो. येईन मी तुझ्यासोबत. तिकीटं बुक केलीयेत का करायची आहेत?"
"मी करतेच आहे आत्ता. एनीवेज, तुला त्रास देतेय त्याबद्दल सॉरी आणि तु येतो आहेस म्हणून थॅंक्स."
"हम्म्म्म्म्म..."
ही वेळ खरं तर आभारप्रदर्शनाची नव्हतीच मूळी। अनिलला वाटलं की तिला हे बोलून दाखवावं. पण आदिती अशीच होती. ज्या त्या गोष्टी तिथल्या तिथे मिटवणारी. प्रत्येक बाब योग्य वेळी एकनॉलेज करायला हवी, वेळ निघून गेल्यावर होणारी हळहळ त्यामूळे टळते. उगाच भूतकाळाचं ओझं वर्तमानात वाहून आणण्यात काही मजा नाही असल्या विचारांची ती.


आदितीचे वडील ज्या सामाजिक संस्थेसाठी काम करत होते, त्या संस्थेच्या कामानिमीत्त ते नागपूरला गेले होते. तिकडे त्यांच्या गाडीला अपघात होऊन त्यांच्यासह त्याच संस्थेची अजून काही माणसेही मृत्युमूखी पडली होती. आदितीचे काका पोहोचेपर्यंत आणि नंतरही तिला अनिलचा खरंच फार आधार वाटायला लागला होता.


त्या घटनेनंतर काही आठवड्यांनी आदिती पुन्हा कामाला यायला लागली होती. आताशा अनिल आणि ती एकमेकांच्या जवळ यायला लागले होते. अशाच एका संध्याकाळी दोघे मरिन ड्राईव्हला भेटले.
"इकडे आलं की फार छान वाटतं नाही अनिल?"
"हो गं"
"मला त्या अलिबागच्या ट्रिपची आठवण होते. त्यादिवशी काय छान पाऊस पडत होता. बराच वेळ उभे होतो ना आपण..."
"त्या दिवशी पावसात भिजल्यावर फार छान दिसत होतीस तु"
"आणि तु हे आज मला सांगतोयस होय?"
"अरे तेव्हा तुला मी जेमतेमच ओळखत होतो ना, एकदम अशी तुझी तारीफ केल्यावर कशी रिएक्ट होशील याचा अंदाज नव्हता ना त्यावेळी."
"हम्म्म्म, जरा फणकार्‍यानेच वागते मी, तुझाही तसा समज होणं स्वाभाविकच होतं म्हणा. पण खरं सांगू का, सेल्सचा जॉब करताना एक एक असे लोक भेटले ना, की थोडं टफ व्हावच लागत. पण त्यादिवसानंतर का माहित नाही पण तुझ्याबरोबर बोललं की, भेटलं की फार बरं वाटतं. एक मित्र म्हणून तुझा फार आधार वाटायला लागला." आदिती मग तिच्या बालपणाविषयी, कॉलेजबद्दल सर्व काही अनिलला न विचारताच सांगू लागली. जणू काही फार दिवसांपासून जे तिच्या मनात साचून राहिलं होतं त्या सर्वच गोष्टी ऐकायला एक हक्काचा श्रोताच मिळाला होता तिला. बोलता बोलता ती तिच्या बाबांविषयी बोलायला लागली आणि एकदम भावनाविवश होऊन अनिलच्या खांद्यावर डोकं ठेवून तिने आपल्या अश्रूंना वाट करून दिली.


दोघांच्या मैत्रीचे बंध आणखीच घट्ट होत गेले.

(क्रमश:)

ती दोघं - १

ती दोघं

आज बर्‍याच दिवसांनी अनिल फ्री होता. ना कुठले सिस्टीम डाऊन कॉल्स अटेन्ड करायचे होते, ना कोणत्या क्लायंट मिटींग्स. सहज खालच्या टपरीवर जाऊन चहा पिऊन यावा म्हणून त्याने शेखरला हाक मारली, "अरे शेखर चल, दामोदरच्या टपरीवर चहा टाकून येऊ रे. कॅन्टीनमधल्या चहाचा कंटाळा यायला लागलाय आता."

"आज काय, देवळे महाराज निवांत दिसतायत? पण मित्रा, जमणार नाही रे. ही एवढी बिलं क्लेमला लावली की लगेच परेलला पळायचय. त्या हिडिंबा मातेने १० मिनीटापूर्वीच आदेश दिलाय. घरी जायची वेळ, आणि क्लायंटचा युपीएस उडायची वेळ ही एकच असते ना रे. तुम्ही या आस्वाद घेऊन, सोबत कोणी नसेल तर हिडिंबेलाच घेऊन जा ना." शेखरच्या या वाक्यावर दोघे मनमुराद हसले आणि तेवढ्यात शेखर बिलं सबमिट करायला अकाऊंट्स मधे निघूनही गेला.

"रोज साला या कामातून एक क्षण उसंत मिळत नाही आणि वेळ मिळाला की तो घालवायचा कसा हे ही कळत नाही". अनिल स्वत:शीच विचार करत खाली निघाला. टपरीवर पहातो तर, दामोदर एका कानाला फोन टकवून होता.
"दामोदर, किससे बतिया रहा है? चाय पिला यार"
"अनिल साब, कैसे हैं? बहोत दिनों के बाद पधारे इधर? ए बाबू चाय दे साब को. गांव से फॉन हे. बिबी." एवढे बोलून तो परत त्याच्या फोनवरच्या संभाषणामधे गुंगला. टपरीवरच्या पोर्‍याने अनिलला चहा दिला. इतक्यात समोरून शेखर पळत पळत स्टेशनला जाणार्‍या बसमधे चढून निघून गेला.

अनिल देवळे हा तसा सुखवस्तू मध्यमवर्गीय चौरस घरातला. बाबा रेल्वेमधून रिटायर झालेले आणि तीनेक वर्षांपूर्वी, सामान्यत: सर्वच मध्यमवर्गीय कुटुंबांप्रमाणे माटुंग्याच्या चाळीतली ’खोली’ विकून डोंबिवलीला तिसर्‍या मजल्यावरच्या ’उंची’वर रहायला आलेले. सविताचे, अनिलच्या बहिणीचे लग्नही त्याच दरम्यान थाटामाटात पार पडलेले. इलेक्ट्रॉनिक्समधे डिप्लोमा करून अनिलने टेक्निकल सपोर्ट इंजिनीयर म्हणून इकडची नोकरी धरली आणि केवळ अंगभूत कौशल्यावर सर्विसबरोबर सेल्सही बघू लागला. कष्टाळू असण्यापेक्षाही, ’इथेच रमलोय, कशाला उगीच दुसरीकडची माती शिंगाने उकरत बसा’ ह्या स्वभावामूळे तो इकडे टिकला आणि चांगलीच प्रगतीही करू लागला. होता होता, लहान वयातच जबाबदारीची पदंही त्याला मिळू लागली. आता वयाच्या २७ व्या वर्षी वेस्ट झोनचा सर्विस हेड झालाय, त्याचबरोबर सेल्सही पहातोच आहे. अनिल तसा मूळातच ’गमत्या’ स्वभावाचा, अगदी व्हीपीपासून ते न्यू जॉइनीज, एवढंच कशाला तर अगदी काळे दादाच्या ऑफिस बॉइजच्या घोळक्यातही तितक्याच सहजतेने रमणारा. पण गेले तीन-चार महिने सर्वांशी जरा अलिप्तच रहात होता. पावसाळ्यात काळे दादाच्या ओळखीतला गाडीवाला गाठून लोणावळ्याला ’वर्षा सहल’ घडवून आणणारा अनिल असा बघितला की, काहीतरी चुकल्यासारखेच वाटत होते सगळ्यांना. पण आताशा सवयच होऊन गेली होती सर्वांना याची. या वेगवान माणसाच्या उधाणलेल्या आयुष्याला खिळ घातली होती ती त्याच्या घटस्फोटाने.

साधारणत: तीनेक वर्षांपूर्वी, घर बदलायच्या घाईगडबडीत असताना ’असिस्टंट मॅनेजर - सेल्स’ या पदावर आदिती नाईक नावाची तरूणी आली. तशी बर्‍यापैकी नविन आणि वयाने पदासाठी लहानच होती. कॉलेजपासूनच स्वावलंबीपणामूळे, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी म्हणा किंवा आणखी काही, पण आपला पॉकेटमनी स्वत:च कमवायला लागलेली ही तरूणी एका वर्षाच्या अनूभवावर अनिलच्याच कंपनीमधे रूजू झाली. आता सेल्समधे चारेक वर्ष काढल्यामूळे बर्‍यापैकी व्यावसायिक समंजसपणा तिच्यात आला होता. त्यामूळे कोणता माणूस हा आपल्या कामाचा आहे आणि कोणता नाही याचा चटकन अंदाज तिला यायचा. तिच्यादृष्टीने कमी महत्वाच्या माणसांसोबत ती अगदी माफकच बोले. कामात मात्र जितकी चाणाक्ष तितकीच चलाख आणि चपळ.

जॉइन झाल्याच्या दुसर्‍याच दिवशी तिला अनिलबरोबर एका सेल्स पिचसाठी जावं लागलं. जाता जाता अनिलने जरा जपूनच तिची चौकशी सुरू केली. त्याच्या अवांतर विषयांना परत कामाच्या विषयांवर आणतानाच त्याच्या माफक विनोदांना तिने काही थारा दिला नाही. त्यादिवशी अनिलला वाटलं की ही मुलगी जरा अधूच आहे डोक्याने म्हणून. पण जसजसे दिवस सरकू लागले, तसतसे तिचा क्लायंट हॅण्ड्लिंगचा सराईतपणा, तिचा गरजेएवढा फटकळपणा आणि करियर बद्दलच्या ठाम, स्पष्ट अपेक्षा ऐकून त्याचे तिच्याबद्दलचे मत नक्कीच बदलायला लागले होते. तिचे वडील, एक सामाजिक संस्थेशी निगडीत होते व पाच वर्षांपूर्वी स्वेच्छानिवृती घेऊन झारखंडमधे खाणकामामूळे होणार्‍या पर्यावरणहानीविरूद्ध लढणार्‍या त्या संस्थेत पुर्णवेळ काम करत होते. आई एका खाजगी बॅंकेत उच्चपदावर काम करत होती. एवढीच काय ती वैयक्तीक माहिती त्याला मिळू शकली.

काही दिवस असेच निघून गेल्यावर असेच एकदा त्या पावसाळ्यात अनिलने सहलीसाठी सर्वांकडे विचारणा केली. तसे ४-५ जण लगेच तयारही झाले. सहज म्हणून त्याने आदितीलाही विचारलं. अनपेक्षितपणे तिनेही होकार कळवला. ठरलेल्या वेळेला सगळे मुंबई सोडून अलिबागच्या दिशेला निघाले. सगळ्याच पिकनीकमधला दंगा इथेही सुरू झाला. सगळ्याचा केंद्रबिंदू मात्र अनिल. त्याचे ते विनोद, घडलेले किस्से सांगण्याची एक खुमासदार शैली, सगळंच नेहमीप्रमाणे. आणि नेहमीप्रमाणेच, व्हीपी जोगळेकरांची सेक्रेटरी मधुरा त्याच्याकडे गुंग होऊन पहात होती. सगळ्यांच्याच लक्षात येण्याइतपत तिचं त्याच्याकडे पहाणे इतरांच्या निदर्शक कटाक्षांमधे दिसतच होतं. काशीद लागताच जोरदार पावसाने त्यांना गाठले. तसे सर्वजण म्हणाले की, आधी पावसात भिजूया मग रूमवर जाऊया म्हणून. म्हणाले काय, सगळे उतरले सुद्धा. मग, शेखरबरोबर अनिल लॉजवर गेला, रूम वगैरे नक्की केल्या आणि सर्वांचे सामान तिकडे टाकून समुद्रकिनारी दाखल झाला. अथांग समुद्र, नयनरम्य किनारा आणि तुफान कोसळणारा तो पाऊस या सर्वांआधी त्याचे लक्ष खिळून राहिले ते चिंब भिजलेल्या आदितीकडे आणि आज वेगळ्याच भासणार्‍या तिच्या डोळ्यांकडे. नेहमी प्रत्येक गोष्टीत निर्णायकता दाखवणारे ते डोळे आज फक्त मुग्ध होते. कुठल्याही बाबीची चूक बरोबर करणारी आदिती समूद्राच्या पाण्यात उभी राहून आज तो पाऊस फक्त मनात साठवून घेत होती. इतर सगळे मस्त गाणी वगैरे गात होते. पण ही एकटीच. जणू काही बाकीजण हिच्या खिजगणतीतही नव्हते.

अनिल तिच्याशेजारी उभा राहिला. त्याला वाटत होतं की म्हणावं की, ’काय सही पाऊस पडतोय ना’, ’इकडे काय करतेस एकटी?’ पण काय ते नक्की ठरत नव्हतं. एवढ्यात तिच म्हणाली, "अशा पावसात कुणी काहीच बोलू नये, फक्त पाऊस, निसर्ग आणि आपण. अंतर्मुख करायला लावणारं असं सुंदर वातावरण हे."
"हं"
"तुला काय वाटतं?"
तिच्या या प्रश्नावर मात्र अनिलसारख्या किशोरभक्ताने स्वत:च्याही नकळत मराठी किशोर-सौमित्रचा हात पकडला.
"पाऊस पडून गेल्यावर मन पागोळ्यांगत झाले, क्षितीजाच्या वाटेवरती पाण्यावर रांगत गेले."
तिने त्याच्याकडे पाहिले व नुसते मंद स्मित केले. ते पहाणे चमकून पहाणे नव्हते, आश्चर्यकारक नव्हते, प्रेमळ नव्हते, तर फक्त मुग्ध होते. त्यावेळी अनिलला वाटले की, गेला, आपला तोल गेला म्हणून. त्यालाही तिच्यासारखंच फक्त पाऊस आणि समुद्रच पहावासा वाटत होता. पण भिजत्या पावसात आदितीचं ते सुंदर रूप त्याला अधिक मोहित करत होतं. अगदी प्रयत्नपूर्वक तो तिच्याकडे पहाण्याचं टाळत होता. त्याचबरोबर त्याला हेही वाटत होतं की कसं का होईना, पण तिला कळावं की ती किती मोहक दिसते आहे या भिजर्‍या रूपात. पण कसं? तेच तर कळत नव्हतं!

(क्रमश:)